Thursday 30 January 2014

विकलो होतो

उपकाराच्या ओझ्याखाली दबलो होतो
कर्ज फेडण्या बाजरी मी विकलो होतो

लिलाव होणे आयुष्याचा टळू न शकले
लिहून खाते नादारीचे थकलो होतो

मृगजळ पुढती पाठलाग मी करता करता
शुन्यासंगे दोस्ती करण्या शिकलो होतो

कधीच नव्हती हाव मनाला सन्मानाची
परिस्थितीच्या रेट्यापुढती झुकलो होतो

आनंदाचे स्वप्नही कधी पडले नाही
तरी कधी मी माझ्यावरती हसलो होतो

मैत्री माझी वेदनांसवे घट्ट एवढी!
काट्यांवरती शांत शांतसा निजलो होतो

सूर्य मला का म्हणता? मी तर लपून जगलो
उगवायाच्या अधीच मी मावळलो होतो

नोंद न झाली जगात माझी, जणू काय मी
अनंतात मरण्याचाआधी विरलो होतो

दैव मागणे “निशिकांता”ला जमले नाही
प्राक्तनात जे मुकाट देवा जगलो होतो

No comments:

Post a Comment